ओव्हरलोड अवजड वाहनांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन


ओव्हरलोड अवजड वाहनांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन 

कन्हान : - कन्हान शहरातील तारसा रोड मार्गावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रकची वाहतूक सुरू असून , या अवैध वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे . पुलाच्या स्पॅनमध्ये वाढलेले अंतर आणि पुलाला होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेता या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी होत आहे . प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून , याविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जन आंदोलन छेडले .


गेल्या अनेक दिवसांपासून तारसा रोडवर ओव्हरलोड ट्रक निर्बाधपणे धावत आहेत . कन्हान वाहतुक पोलीस व आरटीओ विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याने वाहनचालकांची दादागिरी वाढली आहे . टोल वाचवण्यासाठी कोळसा , वाळू , गिट्टी , माती आणि राख भरलेले अवजड टिप्पर ट्रक या मार्गावरून जात आहेत . परिणामी , नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या स्पॅनमध्ये मोठे अंतर पडले असून , पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे .


या मार्गावर अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत . तसेच शहीद चौक ते तारसा चौक या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात बाजार भरतो . दररोज नागरिक , विद्यार्थी आणि छोटे व्यापारी जीव मुठीत धरून या मार्गावरून ये-जा करतात . अवजड वाहनांमुळे होणाऱ्या संभाव्य अपघातांचा धोका सतत वाढत आहे . मात्र , तरीही प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत .


याच पार्श्वभूमीवर , शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले आणि शहर प्रमुख गजानन गोरले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी तारसा चौकात जन आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात ट्रक चालकांना पुष्पहार घालून निषेध करण्यात आला .


आंदोलनाच्या वेळी तहसीलदार रमेश पागोटे , पीडब्ल्यूडी अभियंता सुहास अलेवार , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कलबीरसिंग कलसी , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी हजेरी लावली. प्रशासनाने आंदोलकांना तारसा रोड मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आश्वासन दिले . मात्र , हे आश्वासन केवळ वेळ काढूपणा आहे का , याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


आंदोलनानंतर आरटीओ विभागाने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 9 ट्रकवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केल्याचे सांगण्यात आले . मात्र , हा प्रकार केवळ जनतेच्या रोषाला शांत करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे . कारण , याआधीही अनेकदा अशा कारवाया केल्या जातात , पण प्रत्यक्षात काहीच बदल होत नाही.


शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला 11 फेब्रुवारी पर्यंत ठोस निर्णय घेण्याची चेतावणी दिली आहे . अन्यथा, मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.


या प्रसंगी शशांक घोगले , प्रशांत स्वामी , बापू मालाधारे , अतुल यादव , नितेश मेश्राम , सतीश मुळे , जितु वाघमारे , सुनील चौधरी , शिव स्वामी , फजित खंगारे , जितेंद्र तिवारी , राकेश गुसाई , अमोल राऊत , अभिलाष पिल्ले , आकाश देऊळकर , गौरव गजभिये , चेतन जयपुरकर , नितीन इखार , विनोद कांबळे , विजय खेरगडे , आकाश भगत , सोनू खान सह आदि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या